संपर्क क्रमांक : ९५५२५८१४४५, ७३९१९७०४९१
कागल राम मंदिर – रचना

वास्तुशास्त्र आणि स्थापत्य शास्त्राचा सखोल अभ्यास करून हे मंदिर बांधण्यात आले आहे. स्थापत्य शास्त्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कसबी कारागिरांद्वारे या मंदिराची देखणी वास्तू उभी राहिली. मंदिराच्या बांधकामासाठी प्रामुख्याने संगमरवर या शुभ्र व सुंदर दगडाचा वापर करण्यात आला. राजस्थान मधील ‘मकराना’ येथील संगमरवर हा सर्वात उत्तम प्रतीचा संगमरवर म्हणून ओळखला जातो. या मंदिराच्या निर्मितीसाठी याच ‘मकराना’ संगमरवराचा वापर करण्यात आला आहे.

हे मंदिर भव्य व प्रशस्त असून त्याची रचना त्रिस्तरीय पद्धतीने करण्यात आली आहे. प्रवेशद्वारा समोर प्रशस्त प्रांगण, भव्य दर्शन मंडप व गर्भगृह यांचा समावेश आहे. दर्शन मंडपाच्या चारही बाजूंना श्रीगणेश, श्रीदत्तात्रय, श्रीमहालक्ष्मी व श्रीमहादेव या देवतांची मंदिरे आहेत. दर्शन मंडप आणि गर्भगृह यावरील भव्य शिखरे लक्षवेधक आहेत. मुख्य मंदिराभोवती प्रशस्त प्रदक्षिणा मार्ग आहे.

मंदिराच्या तळ मजल्यावर विशाल ध्यान मंदिर बांधण्यात आले आहे. एकावेळी ४०० ते ५०० भाविक बसू शकतील एवढी त्याची क्षमता आहे. मंदिरामधील घुमट, खांब तसेच दरवाजे यांवर सुबक व रेखीव नक्षीकाम करण्यात आले आहे. मंदिराची शोभा वाढवणारे हे नक्षीकाम नामांकित व कुशल कारागिरांकडून करून घेण्यात आले आहे. अतिशय सुरेख व प्रसन्न असे हे मंदिर भाविक व पर्यटक सर्वांच्याच मनावर आपला विशेष ठसा उमटविते.