
कागल राम मंदिर
या वैभवात नुकतीच आणखी एक भर पडली आहे ती येथे नव्याने साकार झालेल्या, शुभ्र 'मकराना' संगमरवरात बांधलेल्या श्रीराम मंदिराची. हे मंदिर साकार झाले ते स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या संकल्पनेतून. सुंदर वास्तू व शांत, प्रसन्न वातावरण यामुळे श्रीराम भक्तांना तसेच पर्यटकांना हे मंदिर ओढ लावत आहे.
उद्देश व संकल्पना
कागल शहरातील राम मंदिर हे घाटगे घराण्याचे कुलदैवत. या प्राचीन मंदिराची अनेक ठिकाणी पडझड झाली होती. यामुळे या परिसरावर आलेली अवकळा पाहून त्यांचे मन व्यथित होत असे. मंदिराच्या बर्याचशा भागाची पडझड झाली असल्याने हे श्रीराम मंदिर पुन्हा नव्याने उभारायचा संकल्प त्यांनी केला.
हा संकल्प पूर्ण करण्यासाठी स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी कसून प्रयत्न केले. एखाद्या कामाला सुरुवात करताना पूर्ण तयारीनिशी आणि त्या विषयाचा सर्वांगीण अभ्यास करूनच काम करावयाचे हा राजे साहेबांच्या स्वभावातील मोठा विशेष गुण. श्रीराम मंदिराविषयी तर त्यांच्या मनात विशेष जिव्हाळा होता. अतिशय विश्वासू आणि समर्पित वृत्तीने काम करणार्या लोकांची निवड करून त्यांनी श्रीराम मंदिर जीर्णोद्धार समिती स्थापन केली. मंदिराचे बांधकाम सुसूत्रतेने व्हावे यासाठी स्थापत्य आणि वास्तू शास्त्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी लोकांचा सल्ला घेतला व त्यांच्याशी मंदिराच्या बांधकामाच्या आराखड्याविषयी सखोल चर्चा केली. समितीचे सदस्य आणि तज्ञ यांच्यासह राजे साहेबांनी दिल्लीतील अक्षरधाम तसेच स्वामी नारायण मंदिर यांसारख्या भव्य वास्तूंना प्रत्यक्ष भेट दिली. या अभ्यासामधून मंदिराचा प्राथमिक आराखडा तयार झाला व त्यानंतर पुढील कामास सुरुवात झाली.
